३०० पेक्षा अधिक गणना घरे असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा; शिक्षक समिती खेडची तहसीलदारांकडे मागणी

खेड (प्रतिनिधी) : देशव्यापी जनगणना मोहिमेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून प्राथमिक शिक्षक मोठ्या जबाबदारीने हे राष्ट्रीय कार्य पार पाडत आहेत. मात्र काही प्रगणकांवर कामाचा वाढता ताण असल्याने ३०० पेक्षा अधिक गणना घरे देण्यात आलेल्या प्रगणकांना मदतनीस प्रगणक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समिती खेडच्या वतीने तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मे महिन्याच्या कडक उन्हात अनेक शिक्षक दिवस-रात्र जनगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही प्रगणकांना ३०० हून अधिक गणनाघरे देण्यात आल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे जनगणनेचे काम अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी अशा प्रगणकांना मदतनीस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे शिक्षक समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. यावेळी तहसीलदारांनी समितीच्या मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतली. सध्या सुरू असलेले गणनाघरांचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच ज्या प्रगणकांकडे ३०० पेक्षा अधिक गणनाघरे आहेत त्यांना पुढील टप्प्यात मदतनीस प्रगणक उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
तहसीलदारांच्या भेटीदरम्यान शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, प्रवक्ता शैलेश पराडकर तसेच बबन मोरे आणि सुनील वाघमारे उपस्थित होते. तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे जनगणना कामात गुंतलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाल्याची भावना शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.