डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे ३० वर्षांच्या अविरत सेवेनंतर सेवानिवृत्त
सावंतवाडी । प्रतिनिधी :
“आईच्या डोळ्यांतील अश्रू पाहून डॉक्टर होण्याचा निर्धार केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ऊस शेतीत काम करत असताना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाल्याचे पत्र आले आणि तिथून खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. पुढे तब्बल ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून प्रामाणिकपणे कार्य केले,” अशा भावना सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. डॉ. ऐवळे यांच्यासोबतच क्ष-किरण तंत्रज्ञ शिवाजी देवर्डेकर हे देखील सेवानिवृत्त झाल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या सेवाकाळातील चढ-उतारांबद्दल बोलताना डॉ. ऐवळे भावुक झाले. ते म्हणाले, “सावंतवाडीत कार्यरत असताना माझ्या मुलाचे निधन झाले. या प्रचंड दुःखातून सावरणं कठीण होतं. मी जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र माझ्या पत्नीने सावंतवाडीतील घर न सोडण्याचा खंबीर निर्णय घेतला. या कठीण काळात मी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू झालो. तेथे एकट्याने रुग्णालय सांभाळले. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका आणली आणि त्या रुग्णालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. दोडामार्गला सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ अशा सर्व भूमिकांमध्ये मी लोकांची सेवा करू शकलो.”
पुढे ते म्हणाले की, आज वैद्यकीय अधीक्षक म्हणून निवृत्त होताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोड्युलर आयसीयू, सीटी स्कॅन, डायलिसिस सेंटर यांसारख्या आधुनिक सुविधा सुरू करू शकलो, याचे मनाला मोठे समाधान आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दशके सेवाभावाने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. ऐवळे यांच्या निवृत्तीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्गचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, उबाठा शिवसेनेचे बाबूराव धुरी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, ॲड. नकुल पार्सेकर, आणि सौ. सीमा मठकर आदींनी आपल्या मनोगतातून डॉ. ऐवळे यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हा निवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला निवासी अधीक्षक डॉ. सुबोध इंगळे, डॉ. राजेश नवांगुळ, अशोक दळवी, डॉ. पंकज पाटील, डॉ. संजय वाळके, डॉ. नित्यानंद मसूरकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. निखिल अवधूत, डॉ. मणेर, सिस्टर राणे, डॉ. सागर जाधव, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. राजेश गुप्ता, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. धीरज सावंत, डॉ. रामदास रेडकर, सोनू गवस, प्रा. सतीश बागवे, पुंडलिक दळवी, देवा टेमकर, प्रथमेश प्रभू, रूपा मुद्राळे, हेलन निब्रे, साबाजी मांजरेकर, एकनाथ हळदणकर, डॉ. प्रवीण कुमार ठाकरे, डॉ. संजय दळवी, डॉ. सौ. स्वार, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, भगवान गवस यांच्यासह सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













