उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला
पोलादपूर(शैलेश पालकर)- मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत रसत्याबाहेर उभ्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागील भागात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील मायलेकी जागीच ठार झाल्या तर बापलेक गंभीररित्या जखमी झाले. हे कुटुंब अहिल्यानगर येथून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये चालले होते.


पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्या बाहेर आयशर ट्रक(क्र.एम एच ४ एलवाय१६३८) उभा करून चालक नदीकिनारी शौचास गेला असता उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून येणाऱ्या कारने (एमएच ०८एएन २४३९) महामार्ग सोडून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कार चालक दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक कुल सचिव असलेले अनिल रावसाहेब मरकड (वय ४४) आणि मुलगा चिन्मय मरकड (वय५) हे गंभीररित्या जखमी झाले. अनिल मरकड यांना अधिक उपचारासाठी मुंबईकडे पाठविण्यात आले तर मुलगा चिन्मय याला महाडं येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये अनिल मरकड यांच्या पत्नी आणि स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक असलेल्या सुवर्णा मरकड (वय ४५) व मुलगी अनुश्री (वय १६) यांचा अपघातस्थळी जागीच मृत्यू झाला.


या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक सतीश पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच नरवीर व काळभैरवनाथ रेक्स्यू टिम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातातील पती अनिल मरकड हे अहिल्यानगरचे मूळ रहिवासी असून पत्नी सुवर्णा मरकड या दापोलीतील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी आहेत. पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी भेट दिली. पोलीस सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू होत आहे.













