सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मिनी बसेस मंजूर
तूर्तास तिकीट दरवाढ नाही; १ जूनपासून डेपोतील स्वच्छतागृहे मोफत
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी, दोडामार्ग आणि मालवण येथील एसटी बस डेपो सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्वावर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री स्तरावर घेण्यात आला आहे. यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात निविदा काढण्यात येणार आहेत. तसेच, डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला ३१० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत असला, तरी सध्या तरी कोणतीही तिकीट दरवाढ केली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे दिली. परिवहन मंत्र्यांनी आज सावंतवाडी डेपोला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या दौऱ्यादरम्यान स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात परिवहन मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, गोपाळ सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, दोडामार्ग तालुका प्रमुख व उपसभापती गणेशप्रसाद गवस, युवा सेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नाडिस, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, माजी सभापती अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, सभापती सुष्मिता जाधव, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, राजन रेडकर, गोविंद वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी डेपोमधील स्वच्छतागृहे आणि शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. सर्व डेपोंमध्ये यांत्रिक पद्धतीने स्वच्छता राखली जाईल आणि तेथे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सावंतवाडी एसटी डेपो हा बारामतीच्या धर्तीवर सर्व सुविधायुक्त व आधुनिक ‘पोर्ट’ प्रमाणे विकसित केला जाईल, ज्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयींना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, डेपोमधील ‘हिरकणी कक्ष’ देखील आधुनिक करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मिनी बसेस मंजूर
ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मिनी बसेस दिल्या जाणार आहेत. यामध्ये सावंतवाडीसाठी २० बसेस, रत्नागिरी ३० बसेस,
चिपळूण व खेड प्रत्येकी २० बसेस,
राजापूर १५ बसेस,
मालवण, कणकवली, देवगड तसेच विजयदुर्ग आणि लांजा प्रत्येकी १० बसेस तर दोडामार्ग, कुडाळ आणि वेंगुर्लेसाठी प्रत्येकी ५ बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.
कोकण आणि मुंबई-ठाणे यांचे जवळचे नाते असल्याने या भागात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस सुरू करण्याबाबत निश्चितच आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
२०३५ नंतर एसटीचा ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक
भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, येत्या २०३५ नंतर एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकही डिझेल बस नसेल; सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही मार्गांवर इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकण्याचा विचार नाही
एसटी डेपोच्या २०० मीटर परिसराच्या आत जर खाजगी बसेस बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महामंडळावर सध्या ३१० कोटींचा बोजा पडला आहे. सध्यातरी प्रवाशांवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकण्याचा विचार नाही; मात्र भविष्यात डिझेलचे दर अशीच वाढत राहिले, तर नाईलाजाने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी शेवटी सूचकपणे नमूद केले.













