सावंतवाडीतील मठकर दांपत्याने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकावला तिरंगा

ऐतिहासिक कामगिरीनंतर शहरात जंगी स्वागत

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दांपत्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गिर्यारोहक जोडप्याने उणे तापमान आणि अत्यंत प्रतिकूल हवामानावर मात करत हे खडतर आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या साहसी कामगिरीमुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातून या दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​हा अभूतपूर्व विक्रम केल्यानंतर रविवारी हे दांपत्य सावंतवाडीत आपल्या घरी परतले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. एकमेकांना मिठाई भरवत आणि पेढे वाटत मित्रपरिवाराने मोठा जल्लोष केला.

​यावेळी भावना व्यक्त करताना अक्षय मठकर म्हणाले की, “माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. यात संपूर्ण कुटुंबाची खंबीर साथ लाभल्यामुळेच हे अवघड आव्हान आम्ही साध्य करू शकलो. आज आमच्यामुळे सावंतवाडीच्या नावलौकिकात भर पडत असल्याचे पाहून मनापासून आनंद होत आहे.”

​तर सौ. नुपूर मठकर यांनी आपल्या भावना मांडताना सांगितले की, “या मोहिमेसाठी आम्ही गेली सहा महिने सातत्याने कठीण सराव करत होतो. चढाई दरम्यान अनेक आव्हाने समोर आली, पण कोणत्याही परिस्थितीत हे ध्येय पूर्ण करण्याचा निश्चय आम्ही केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद पाठीशी होते, त्यामुळेच हे साध्य करता आले. या प्रवासात माहेर आणि सासरच्या दोन्ही बाजूंकडून मिळालेला पाठिंबा अत्यंत प्रेरणादायी ठरला.”

​या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी दोन्ही बाजूंचे कुटुंबीय, नातेवाईक आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात बाळकृष्ण मठकर, भारती मठकर, अनिल चोडणकर, शर्वरी चोडणकर, संजय मठकर, श्रावणी मठकर, अदित मठकर, दुर्वा मठकर, श्रीया मठकर, आबा पिंगुळकर, मीना पिंगुळकर, ऐश्वर्या पिंगुळकर, उमेश पिंगुळकर, ज्योती कारेकर, साईप्रसाद मालवणकर, सावी मालवणकर, श्रीजा मालवणकर, प्रशांत मठकर, प्रिया मठकर, सुनील शिरोडकर, पूजा शिरोडकर, अचल माणगावकर, डॉ. अनिश स्वार, कुणाल खोत, पावन चोडणकर, सूरज नाटेकर, प्रतीक चोडणकर, संकल्प तेंडोलकर, मिहिर मठकर आदी मान्यवरांचा समावेश होता. उपस्थित सर्वांनीच या धाडसी दांपत्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.