‘सॅलरी अकाऊंट’ विमा योजनेअंतर्गत तब्बल 23.84 लाखांचा विमा लाभ

अपघाती मृत्यु झालेल्या कंत्राटी विज कर्मचारी अनिकेत परवडी यांच्या वारसांना धनादेश प्रदान
बँक ऑफ इंडियाकडून प्रयोजन

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-तिठवली येथील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना बँक ऑफ इंडिया, राजापूर शाखेकडून बँकेच्या ‘सॅलरी अकाऊंट’ विमा योजनेअंतर्गत तब्बल 23 लाख 84 हजार 100 रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे.
दि. 6 जानेवारी 2026 रोजी पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असताना महावितरण राजापूर उपविभागात कार्यरत कंत्राटी कर्मचारी अनिकेत परवडी यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अनिकेत परवडी यांचे बँक ऑफ इंडिया, राजापूर शाखेत सॅलरी अकाऊंट होते. बँकेच्या खातेदार विमा संरक्षण योजनेअंतर्गत त्यांचा विमा उतरविण्यात आलेला असल्याने त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला. शनिवारी ही विमा रक्कम अनिकेत यांच्या आई सुरेखा परवडी यांच्या खात्यात धनादेशाद्चवारे वर्ग करण्यात आली.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, महाराष्ट्र राज्य आऊटसोर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे, बँकेच्या सॅलरी अकाऊंट विभागाचे मुकेश मेश्राम, महावितरणचे श्री. गावकारे, तसेच बँकेच्या राजापूर शाखेचे व्यवस्थापक कन्नन बानू यांच्यासह कर्मचारी विक्रांत राणे, स्वानंद दाते, योगेश जाधव, करण सिंग आदी उपस्थित होते.
अनिकेत परवडी यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेच्या राजापूर शाखेतील कर्मचारी करण सिंग यांनी विशेष पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. या आर्थिक मदतीमुळे दुःखद प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या परवडी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बँक ऑफ इंडीयाच्या सॅलरी अकाउंटसोबत काही विशेष विमा सुविधा दिल्या जातात. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या सॅलरी श्रेणीनुसार विमा कव्हर वेगवेगळे असू शकते. त्यासाठी तुमचे खाते अधिकृत ‘सॅलरी अकाऊंट’ म्हणून बँकेत नोंदलेले असणे आवश्यक असते. ही योजना सामान्यतः सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, संरक्षण दल, पोलीस कर्मचारी अशा पगारदार लोकांसाठी असतात. ज्यांचा पगार नियमितपणे बँक ऑफ इंडियाच्या ‘सॅलरी अकाऊंट’ मध्ये जमा होतो, ते या सुविधांसाठी पात्र असू शकतात. अशा कर्मचाऱ्यांनी आपले खाते बँक ऑफ इंडियामध्ये उघडून योजनेसाठी पात्र व्हा असे आवाहन बँक ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले आहे.