दोनच सीसीटीव्ही पण तेही बंद अवस्थेत
पोलीस व नगर परिषद प्रशासनाची उदासिनता सामान्यांच्या मुळावर
राजापूर प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात शहर व परिसरात झालेल्या चोरीच्या घटना, तर गेल्या दिड-दोन वर्षात सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या घडलेल्या घटनांमुळे जिल्हयात राजापूर शहर हे एक संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. मात्र या शहरातील सुरक्षिततेबाबत ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, जी खबरदारी घेणे आवश्यक आहे ती घेतली जात नसल्याने शहर आणि शहरवासीयांची सुरक्षा ही रामभरोसेच असल्याचे वारंवार पुढे येत आहे. शहरात जवाहर चौकात दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत मात्र ते बंद अवस्थेत असल्याने शहरात एखादी अनुचित घटना वा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल आता नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.
राजापूर शहर हे कायमच चर्चेत राहिलेले शहर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण राजापुरात सर्रास सगळेच नियम धाब्यावर बसविले जातात असेच पहावयास मिळते. शहरातील बेशिस्त वाहतुक व्यवस्था, बाजारपेठेसह रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या गाडया, अतिक्रमणे, सार्वजनिक ठिकाणी केला जाणारा कचरा अशा अनेक बाबी पाहिल्यावर राजापूर शहराला शिस्तच नाही अशा प्रतिक्रीया उमटतात.
शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, स्वच्छता, अतिक्रमणे यावर उपाययोजना करणारी पोलीस व नगर परिषद ही प्रशासकिय यंत्राणा राजापुरात अस्तीत्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा इतका या यंत्रणेचा कारभार सुस्त आहे. जणू आंम्हाला काही पडलेलीच नाही अशा भूमिकेत हे दोन्ही विभाग असतात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
शहरात गेल्या काही वर्षात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातील काहींचा अद्याप शोध लागलेला नाही. आठवडा बाजारात तर नेहमीच चोऱ्या होतात पण त्या कागदावर येत नाहीत आणि उघडही होत नाहीत अशी अवस्था आहे. तर मागील दिड दोन वर्षात शहरात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाही काही घटना घडल्या आहेत. या घडणाऱ्या घटनांनंतर तरी पोलीस प्रशासन व नगर परिषद काहीतरी गांभीर्याने घेईल व उपाययोजना करेल अशी जनतेची माफक अपेक्षा आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
शहरात जवाहर चौकात नगर परिषदेकडून दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र ते कधी सुरू असतात तर कधी बंद असतात. त्यामुळे ते देखील रामभरोसेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शहरात येणाऱ्या तालीमखाना या मुख्य प्रवेशद्वारावर, रानतळे कडून येणाऱ्या प्रवेशद्वारावर, वरचीपेठ पुलावरून येणाऱ्या प्रवेशद्वारावर, कोदवली कडून येणाऱ्या प्रवेशद्वारावर, तालीमखान्याकडून येणाऱ्या प्रवेशद्वारावर,महामार्गावरून कोंढेतडकडून येणाऱ्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेर बसवणे आवश्यक असतानाही अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे राजापूर शहारात कुणीह कधीही या आणि कोणतेही कृत्य करून जा अशीच अवस्था आहे.
जवाहर चौकातील पोलीस चौकी इतिहास जमा
शहरातील जवाहर चौक हे सार्वजनिक व गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकणी यापुर्वी पोलीस चौकी होती व या चौकीत एक पोलीस बसून असायचा तर रात्रीच्या वेळीही गस्तीबरोबरच या पोलीस चौकीचा सुरक्षिततेसाठी चांगला उपयोग व्हायाचा. मात्र ही पोलीस चौकी जी बंद झाली ती पुन्हा सुरूच झाली नाही. यासाठी ना पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले ना नगर परिषदेने केले. त्यामुळे गर्दीचा भाग असलेल्या जवाहर चौकाची सुरक्षाही वाऱ्यावरच आहे अशी शहराची परिस्थिती आहे. जवाहर चौकात दररोज वाहतुक कोंडी होते, मात्र या ठिकाणी पोलीस नसल्याने कोणी कुणाला जुमानत नाही अशी अवस्था आहे. या ठिकाणी राजापूर पोलीसांकडून होमागार्ड पाठवले जातात, मात्र ते देखील त्यांच्या समोर गाडी लावलेली असली तरी बघ्याची भूमिघा घेतात. तर लगतच असलेल्या काही विक्रेत्यांना गाडया कुठेही आणि कशाही लावण्यास मुभा देतात.
गणेशविसर्जन घाट परिसराचा होतोय गैरवापर
नगर परिषदेने लाखो रूपये खर्चुन बंदर धक्का येथे गणेश घाट बांधला असून त्याचे सुशोभिकरण केले आहे. या ठिकाणी बसण्यासाठी बैठक व्यवस्थाही केले आहे. याच परिसरात पिंपळाखाली देवस्थान असून अलिकडेच येथे नंदीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या भागात दर गुरूवारी आठवडा बाजारही भरतो. मात्र या भागात रात्रीच्या वेळी अनेकजण धुम्रपान करण्यासाठी एकत्र येतात, अनेकजण मद्यपान करण्यासाठी या भागात येतात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यातुन जर का कोणता अनुचित प्रकार घडला तर मग त्याला जबाबदार कोण?असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांली लक्ष घालण्याची गरज
राजापुरातील या एकूणच परिस्थितीबाबत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. दरवेळी हे वरिष्ठ अधिकारी सणांच्या काळात वा आपदकालीन परिस्थितीत शहरात बंदोबस्ताला येतात, त्यांना शहरातील या परिस्थितीची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तरी याबाबत गांभीर्याने लक्ष घालुन काही उपाययोजना कराव्यात अशी शहर वासीयांची अपेक्षा आहे. शहरातील वाहतुक कोंडी, बेशिस्त पार्किग, अल्पवयीन दुचाकीस्वारांचा धुमाकुळ याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
न. प. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शहर सुरक्षिततेबाबत उपाययोजना कराव्यात
राजापूर शहरातील या सुरक्षिततेबाबत नगराध्यक्षांसह नगरसेवक व प्रशासनानेही जरा गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शहराच्या विकासात शहराची सुरक्षाही महत्वाची असून सार्वजनिक ठिकाणी तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही बसविणे व अन्य सुरक्षांची उपाययोजना करणेकामी नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य भागात बंद असलेले पथदिप, काही भागात नसलेली पुरेशी प्रकाश व्यवस्था याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रस्ते, संरक्षण भिंती यापलिकडेही विकास असतो याचे भान लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे.












