वेळवी कलानगरचा रस्ता बंद; तीन वर्षांच्या प्रशासनिक उदासीनतेविरोधात ग्रामस्थ आक्रमक

दापोली, प्रतिनिधी:

दापोली तालुक्यातील वेळवी येथील कलानगर परिसरातील सार्वजनिक वापरातील रस्ता अडवल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या तब्बल तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रशासनाच्या दारात प्रलंबित असतानाही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेळवी कांगवई मुख्य रस्ता ते कलानगर पद्मावती मंदिराकडे जाणारा रस्ता हा श्रीम. मालती पडवेकर यांनी सिमेंटचे पोल उभे करून त्यावर तारेचे कुंपण घालून पूर्णतः बंद केल्याने कलानगर गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा कायमचा रहदारीचा असणारा हा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत तहसीलदार आणि पोलीस स्टेशन ला रितसर तक्रार दाखल करण्याकरिता  कलानगर गावातील महिला, पुरुष व शाळेतील मुले असे शंभरहून अधिक ग्रामस्थ आज तहसीलदार कार्यालय येथे धडकले. मा.तहसीलदार यांच्या समोर आपली कैफियत मांडली व 100 वर्षांहून अधिक पूर्वीचा रस्ता मोकळा करून आम्हाला न्याय द्या अशी मगणी केली.
कलानगर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अडविल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शेतकरी वर्गाला मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मात्र या सर्व अडचणींकडे महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते.कलानगर गावचा हा पूर्वांपार रस्ता असून या रस्त्याला ग्रामपंचायत कडून सन 2009/10 या सालात खडीकरण सुद्धा झाले आहे. या रस्त्याला लागून सुमारे 35 ते 40 घरे जोडलेली आहेत.हा रस्ता आता बंद झाल्याने वस्तीत राहणाऱ्या दीडशेहून अधिक लोकांचे तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कायमस्वरूपी वर्दळीचा असणारा हा रस्ता श्रीम. मालती पडवेकर यांनी मनमानी करत बंद केल्याने आता गावातील ग्रामस्थ प्रचंड चिडले आहेत.पडवेकर यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळलेले ग्रामस्थ आता काय व्हायचे ते होऊ द्या अशा भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहे. याआधीही गावातील पाईपलाईन आडविणे, रस्ता बंद करणे, घरकुल योजनेत अडवाअडवी करणे, अशा विविध प्रकारे ग्रामस्थांना श्रीम. मालती पडवेकर यांनी त्रास दिला असल्याचे ग्रामस्थ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या संदर्भात अनेक वेळा निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावे करूनही प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात वाटल्याचे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. मागील तीन वर्षांपासुन महसूल आणि पोलीस स्टेशन अशी टोलवाटोलवी करणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्षात रस्ता मोकळा करण्यासाठी किंवा वाद निकाली काढण्यासाठी कोणतीही प्रभावी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे,” अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तीन वर्षे एखादा प्रश्न प्रलंबित राहणे ही केवळ दिरंगाई नसून प्रशासनिक अपयशाची कबुली असल्याची टीकाही स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, रस्ता तातडीने खुला करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधी, महसूल यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयाच्या अभावामुळे वेळवी कलानगरचा रस्ता प्रश्न आज चिघळलेल्या अवस्थेत पोहोचला आहे. तीन वर्षांपासून नागरिकांची होणारी फरफट आणि त्याकडे झालेलं दुर्लक्ष हे कोणत्याही लोकाभिमुख प्रशासनाला शोभणारे नाही. शासनाच्या विविध योजनांचा गाजावाजा होत असताना नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता मिळत नसेल, तर विकासाच्या दाव्यांचे वास्तव काय आहे, हा प्रश्न अनिवार्यपणे उपस्थित होतो.
आता तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर उतरून प्रश्न निकाली काढावा, अन्यथा ग्रामस्थांचा वाढता रोष मोठ्या आंदोलनाचे रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.