निवडणूक काळातील उत्कृष्ट नियोजनाचेही कौतुक
दापोली | प्रतिनिधी दापोली येथील तहसीलदार अर्चना बोंबे यांचा वाढदिवस स्थानिक पत्रकार बांधवांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्चना बोंबे यांनी प्रशासकीय कामात पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुखता जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या अलीकडील काळातील कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. दापोली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी केलेले नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम उल्लेखनीय ठरले. निवडणूक यंत्रणेच्या प्रमुख अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडली. मतदान केंद्रांची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे अचूक नियोजन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व विभागांशी साधलेला समन्वय यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वी ठरली. विशेषतः मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घेतलेली खबरदारी, याबद्दल स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारांनी तहसील प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील सुसंवाद अधिक बळकट व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत प्रशासन आणि माध्यमे यांनी एकत्रितपणे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे, असा सूर यावेळी उमटला. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी प्रसाद रानडे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी राधेश लिंगायत, दैनिक सागरचे प्रतिनिधी आनंद करमरकर, अजित सुर्वे, महेश महाडिक आणि कोकण कट्टा न्यूजचे सलीम रखांगे यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि वार्ताहर उपस्थित होते.













