नमनामध्ये मावशीची भुमिका साकाराणाऱ्या विनयचा अपघाती मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला
देवरूख (प्रतिनिधी):
मावशीला गवळणी पोचवायलाच बसल्यात.. संगमेश्वर तालुक्यातील सायले गावातील त्या रात्रीच्या गच्च अंधारात, पेटलेल्या दिव्यांच्या प्रकाशात विनय सपकाळ याच्या तोंडून उमटलेले हे शब्द आजही तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कानात आणि काळजात सुरीसारखे खुपत आहेत. आपल्या हजरजबाबीपणाने, अचूक टायमिंगने अख्ख्या गावाला पोट धरून हसवणारा एक २४-२५ वर्षांचा तरुण, काही तासांतच सगळ्यांच्या डोळ्यांत अनंत आसवांचे पूर आणून स्वतः मात्र कायमचा शांत होईल, असं कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आणि अत्यंत क्रूर असं शिजत होत.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा सुपुत्र असलेला विनय सपकाळ उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहायचा. पण त्याचं शरीर जरी मुंबईच्या धावपळीत असलं, तरी त्याचा जीव कोकणच्या लाल मातीत, तिथल्या लोककलेत आणि नमनाच्या सुरांमध्ये अडकलेला होता. नमनाचा ओढा त्याला गप्प बसू देत नव्हता. म्हणूनच, खास नमनाच्या कार्यक्रमासाठी तो मुंबईची चाकोरी सोडून गावाकडे धावून आला होता.
रविवार, ३१ मे रोजी संगमेश्वर तालुक्यातील सायले येथे नमनाचा कार्यक्रम झाला. विग्नेशने नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाने, कोकणी भाषेच्या गोडव्याने आणि सहज सुंदर विनोदाने रंगमंचावर अक्षरशः जीव ओतला होता. प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद देत होते. पण तो पडदा पडला… तो विग्नेशच्या आयुष्याचा शेवटचा पडदा ठरेल असं कोणाला वाटलं होतं?
कार्यक्रम संपवून रत्नागिरीच्या दिशेने परतत असताना, निवे बुद्रुक येथे त्यांच्या कारची उभ्या डंपरला भीषण धडक बसली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात विनयचा जागीच अंत झाला. रसिकांना मनोरंजनाची खात्री देणारा, शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारा एक अवलिया कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.
विनयच्या जाण्याने केवळ एका कलाकाराचा अंत झालेला नाही, तर एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा कणाच मोडून पडला आहे. विनय त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. म्हातारपणात ज्याच्या खांद्यावर हात ठेवून त्या वृद्ध आई-वडिलांना जगायचं होतं, ज्याच्या लग्नाचे डोहाळे ते पाहत होते, तोच त्यांचा हक्काचा आधार आज नियतीने अत्यंत निर्घृणपणे हिरावून घेतला आहे.
”ज्या हातांनी मुलाला कौतुकाने रंगमंचावर जाताना पाहिलं, आज त्याच हातांवर त्याच्या मृत्यूची बातमी स्वीकारण्याची वेळ आली. सावर्डे गावातील विनयच्या घरावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वृद्ध आई-वडिलांचा आणि बहिणीचा हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून जात आहे. सायले येथील शेवटच्या कार्यक्रमात विनयने म्हटलेले संवाद, “मावशीला गवळणी पोचवायलाच बसल्यात…” हे शब्द आता त्याचे मित्र, सहकारी कलाकार आणि चाहत्यांच्या डोळ्यात धारा आणत आहेत. ते शब्द निव्वळ संवाद नव्हते, तर तो विग्नेशने या जगाला घेतलेला शेवटचा निरोप होता, हे समजल्यावर सोशल मीडियावर फक्त आणि फक्त हळहळ व्यक्त होत आहे.













