विलास साळसकरांनी आत्मपरीक्षण करावे; मित्रपक्षांवर पराभवाचे खापर फोडू नये : शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके

देवगड (प्रतिनिधी) : भाजप-शिवसेना महायुती असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी युतीधर्म पाळला नाही, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या पराभवासाठी भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप विलास साळसकर यांनी केला आहे. मात्र या आरोपांशी आपण सहमत नसल्याचे देवगड पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके यांनी स्पष्ट केले.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोके म्हणाले की, पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी शिंदे शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद मर्यादित असतानाही पक्षाचे तीनपैकी दोन उमेदवार विजयी झाले. हे महायुतीतील भाजपने युतीधर्म पाळल्यामुळेच शक्य झाले. आज आपण उपसभापती पदावर कार्यरत आहोत, हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाचा आणि महायुतीच्या पाठबळाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

निकाल जाहीर झाल्यानंतरच हा विजय पालकमंत्री नितेश राणे यांचाच असल्याचे आपण जाहीरपणे सांगितले होते, असे नमूद करत लोके म्हणाले की, पक्ष नवीन असल्याने संघटनात्मक बांधणीही पूर्णपणे मजबूत नव्हती. तरीही शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्यास पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनामुळे मदत झाली.

“आम्ही तीन उमेदवार निवडणुकीत होतो. त्यापैकी केवळ विलास साळसकर यांचाच पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः केले पाहिजे. आपल्या पराभवाचे खापर पालकमंत्री नितेश राणे किंवा महायुतीतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांवर फोडणे योग्य नाही,” असेही लोके यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे समाधानकारक काम करत असून राज्यस्तरावर महायुती एकत्र आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्षांनी युतीधर्म पाळला नाही, अशी विधाने करून राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही अमोल लोके यांनी केले.