काजू फॅक्टरी युनिट मधून ९० हजार रुपये किमतीच्या काजूमालाची चोरी

लांजा कोत्रेवाडी येथील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

लांजा (प्रतिनिधी) काजू फॅक्टरी युनिट मधून ९० हजार रुपये किमतीच्या काजू मालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत तो चोरून नेल्याची घटना लांजा कोत्रेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद सुहास सुरेश झिमण (वय ४५, रा. माऊली नगर लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. सुहास झिमण हे लांजा कोत्रेवाडी येथे काजू फॅक्टरी युनिट चालवतात. दिनांक २८ मे रोजी सायंकाळी ६ ते २९ मे रोजी सकाळी ९.२० या कालावधीमध्ये कोत्रेवाडीयेथील झिमण कॅशु प्रोसेसिंग युनिट मधील शेडमध्ये ठेवलेला काजूचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला. यामध्ये ४२ हजार रुपये किमतीचा समीर पंडित यांचा अख्खा काजू, दहा किलोच्या ३७ बॅग ( ३७० किलो) त्यामध्ये पाकळी १७ किलो, तुकडा ३२ किलो. तसेच ४८ हजार रुपये किमतीचा सुहास झिमण यांचा वैयक्तिक काजू त्यामध्ये दहा किलोचा ४८ बॅग (४८० किलो) असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा काजू माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

या प्रकरणी सुहास झिमण यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे , भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.