खेडच्या जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटाचा प्लॅटफॉर्म कोसळला; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील भोस्ते पुलनजीक असणारा जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटाचा प्लॅटफॉर्म जीर्ण अवस्थेमुळे कोसळल्याने आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या दुर्गामाता विसर्जनाच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरवर्षी हजारो गणेशभक्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने पार पडणाऱ्या विसर्जन प्रक्रियेसमोर यंदा मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खेड शहरासह खोंडे, भडगाव आणि तालुक्यातील विविध गावांतील सुमारे दोन हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती तसेच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन जगबुडी नदीवरील या घाटावर केले जाते. अनेक वर्षांपासून विसर्जन कट्टा संस्थेचे स्वयंसेवक विसर्जन व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र घाटावरील मुख्य प्लॅटफॉर्म कोसळल्याने यंदाच्या विसर्जनावेळी स्वयंसेवक आणि गणेशभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
विशेषतः सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरला जाणारा प्लॅटफॉर्म पूर्णपणे कोसळल्यामुळे अशा मूर्तींचे सुरक्षित विसर्जन करणे मोठे आव्हान ठरणार आहे. नदीपात्रात उतरताना स्वयंसेवकांना दुखापत होण्याचा धोका वाढला असून भाविकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना खेड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक, गणेशभक्त आणि स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे. केवळ दुरुस्ती न करता अधिक मजबूत आणि सुरक्षित नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचीही मागणी होत आहे.
विसर्जन काळात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घाटाचे नूतनीकरण तातडीने करण्यात यावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

चौकट
“विसर्जन घाट दुरुस्तीचा निर्णय तातडीने घ्यावा”
“खेड शहरासह खोंडे, भडगाव आणि तालुक्यातील विविध गावांतील सुमारे दोन हजार घरगुती तसेच अनेक सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन जगबुडी नदीवर केले जाते. मात्र यावर्षी संपूर्ण विसर्जन घाटाचा प्लॅटफॉर्म कोसळल्याने मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. स्वयंसेवकांना दुखापत होण्याचा धोका असून गणेशभक्तांनाही समस्यांना सामोरे जावे लागेल. विशेषतः मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी वापरला जाणारा प्लॅटफॉर्म कोसळल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.”
– संतोष शिंदे, अध्यक्ष, विसर्जन कट्टा, खेड