लांजातील जागरूक नागरिकांचा पुढाकार, सार्वजनिक बांधकाम, वनविभागाला निवेदन सादर
लांजा (प्रतिनिधी) :धोकादायक च्या नावाखाली सरसकट वृक्षतोड झाल्याने उजाड झालेल्या तालुक्यातील चारही प्रमुख राज्य मार्गांलगत या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी लांजातील जागृत नागरिकांनी पुढाकार घेतला असून याबाबतचे निवेदन आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम, वनविभाग यांना सादर करण्यात आले.
दरम्यान वृक्ष लागवड न झाल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
लांजा तालुक्यातील लांजा साटवली, लांजा माजळ, जावडे , लांजा कुरणे पुनस , लांजा आसगे दाभोळे या चारही प्रमुख राज्य मार्गालगत यापूर्वी मोठ्या प्रमाणात अकेशिया आंबा व अन्य विविध प्रकारची झाडे होती. त्यामुळे या रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर असा नैसर्गिक वातावरण, तसेच सावली होती.
रस्त्याने ये-जा करणारे पादचारी, विद्यार्थी यांना या झाडांच्या सावलीतून चालणे सोयीस्कर व्हायचे. मात्र वर्षभरात धोकादायक झाडांच्या नावाखाली या सावली देणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. रस्त्यालगत ही सर्व झाडे तोडण्यात येऊन रस्ते झकास करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षात तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात वक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रुक्ष तोड थांबवणे आणि नवीन वृक्षांची लागवड करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या चारही प्रमुख राज्य मार्गांलगत दुतर्फा या पावसाळ्यात कोकणातील देशी झाडे यामध्ये आंबा, फणस ,वड, पिंपळ, जांभूळ या देशी झाडांची लागवड करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री चव्हाण यांनी या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देत पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात आपण चारही रस्त्यालगत किती झाडे लागतील याच सर्वे करून त्याप्रमाणे वृक्ष लागवड करूया असे सांगितले.
सदर निवेदन सादर करताना लांजातील जागरूक नागरिक सचिन लिंगायत, मोहन तोडकरी, मंगेश आंबेकर, बाबा धावणे, अभिजीत राजे शिर्के, सागर वायंगणकर, अभिजीत वाघधरे, भाई चौगुले आदी उपस्थित होते.













