संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष? कोणत्या पासद्वारे होणार वाहतूक?
लांजा (प्रतिनिधी): झाडतोड प्रकरणे गेल्या चार महिन्यांपासून बंद असताना लांजा शहर परिसरात देखील वृक्षतोड केलेल्या झाडांचे साठे (डेपो) जागोजागी आढळून येत आहेत. प्रकरणे बंद असतील तर वृक्षतोड होतेच कशी? म्हणजेच अवैधरित्या ही वृक्षतोड सुरू असून वनविभाग यावर कारवाईचा बडगा उगारणार का? असा सवाल वृक्षप्रेमीतून केला जात आहे.
दरम्यान, जर प्रकरणेच मंजूर नसतील आणि तरीही नवीन झाडांची वृक्षतोड होत असेल तर ही तोड अवैधपणे केली जात आहे का? तसेच या लाकूड मालाची कोणत्या पासद्वारे वाहतूक केली जाणार? असाही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकरी हे आपल्या विविध कामांसाठी, कारणांसाठी झाडतोड करतात. मात्र या झाडतोडीसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे महसूल विभागा मार्फत तलाठ्यांकडून दिली जातात. मात्र जानेवारी २०२६ पासून अचानकपणे महसूल विभागाकडून शेतकरी वर्गाला झाडतोडी प्रकरणासाठी दिली जाणारी कागदपत्रे थांबवण्यात आली आहेत. एकीकडे गेल्या चार महिन्यांपासून झाडतोड प्रकरणे बंद असतानाही लांजा तालुक्यासह शहर परिसरात वृक्षतोड केलेल्या झाडांचे मोठेचमोठे ढीग (डेपो) आढळून येत आहेत. म्हणजेच अवैधपणे व बेसुमार वृक्षतोड सुरूच असल्याचे यावरून सिद्ध होत आहे.
अशा अवैधपणे केल्या जाणाऱ्या झाडतोड मालाची वाहतूक कोणत्या पासद्वारे केली जाणार? तसेच जी मालकी प्रकरणे मंजूर असतात त्या जागेवर माल आहे का? याची खात्री प्रत्यक्ष जागेवर जाऊन करावी व त्या क्षेत्रात लाकूड भरलेल्या गाडीची खात्री करून व जी पी एस रीडिंग घेऊन संबंधित शेतकऱ्याला लाकूड मालास वाहतूक पास द्यावा. अशी ही मागणी केली जात आहे. जेणेकरून वृक्षतोड आणि अवैध वृक्षतोडीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
चौकट- महाराष्ट्र शासन आणि वन विभाग यांच्या वतीने 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी जीवनात पर्यावरणाचे स्थान काय आहे, त्याचे किती महत्त्व आहे यावर भाषणे ठोकले जातात. मात्र आज लांजा तालुक्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ भाषणे करून आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवर बंदी आणली तसेच अशी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई केली तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल. या दृष्टीने शासन आणि वनविभाग कार्यवाही करणार का? असा प्रश्न वन्यप्रेमीतून उपस्थित केला जात आहे













