गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सुरू असलेल्या मेफेड्रॉन निर्मितीच्या कारखान्यावर साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. यापूर्वी मुंबईत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा कारखाना उघडकीस आला. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मुंबईतील अटकेनंतर गुजरातमधील कारखान्याचा शोध
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थ तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरातमधील मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला आहे. 21 एप्रिल 2026 रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोड परिसरातून 109 ग्रॅम मेफेड्रॉनसह मुस्कान समीर खान (वय 26) हिला अटक करण्यात आली होती. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा गुजरातकडे वळली. त्यानंतर नर्मदा जिल्ह्यातील वरखड, ता. नांदोद येथे छापा टाकून मेफेड्रॉन तयार करणारा कारखाना शोधून काढण्यात आला.
74 कोटींचा माल जप्त; तपासाची व्याप्ती वाढली
या प्रकरणातील आणखी एक आरोपी बुलबुल वजूळ कमर अ वफा चौधरी उर्फ पप्पू (वय 56) याला 26 एप्रिल रोजी शिळफाटा परिसरातून अटक करण्यात आली. त्यानेच गुजरातमधील घर भाड्याने घेतल्याची माहिती तपासात समोर आली. कारवाईदरम्यान 20.040 किलो लिक्विड मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 74.46 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय 2-ब्रोमो-4-मेथिलानिलिन, 4-मेथिलप्रोपियोफेनोन, मोनोमेथिलामाइन, ब्रोमिन, क्लोरोफॉर्म यांसारखी विविध रसायने, तीन स्टिरर मशीन, TATA व्होल्टासचे दोन कमर्शियल फ्रीज, गोलाकार फ्लास्क, हिटिंग जॅकेट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व साहित्याची किंमत सुमारे 4 कोटी 76 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलिसांनी देखील अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक मोटरसायकल, दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण 2 लाख 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.










