जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निवेदिता प्रतिष्ठान च्या त्रिसुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ

दापोली :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निवेदिता प्रतिष्ठान तर्फे जागतिक पर्यावरण दिन ते शिक्षक दिन (५ जून ते ५ सप्टेंबर २०२६) वृक्षलागवड… जलसंवर्धन आणि रत्नागिरी जिल्हा प्रमुख प्रजाती पक्षी महाधनेश याच्या संवर्धनार्थ त्रिसूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ ५ जून रोजी दापोली तालुक्यातील जालगाव येथे वृक्षलागवडीने करण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक आणि निवेदिता प्रतिष्ठानचे सल्लागार रमेश जोशी, रघुवीर साटम,महेश्वरी विचारे, सुनील चव्हाण, आणि डॉ. प्रशांत परांजपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्याचे हरित अच्छादन पन्नास टक्के इतके कमी झाले आहे.तसेच भूजल पातळीमध्ये देखील घसरण झाली आहे. वातावरण बदलाला सामोरं जाण्याकरता हरित आच्छादन वाढ आणि जलसंवर्धन या गोष्टीची जाणीव जागृती आणि कृती कार्यक्रम करण्यासाठी. त्याचप्रमाणे ग्रेट इंडियन हॉर्नबिल (महाधनेश) या पक्षाला जिल्ह्यातील प्रमुख प्रजाती (Flagship Species) म्हणून घोषित केले आहे .याच्या संवर्धनार्थ जाणीव जागृती करण्याकरता या त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच रोपट लावताना एक रोप दोन खड्डे या संकल्पनेनुसार लागवड करावी म्हणजे एका खड्ड्यामध्ये रोपटे लावावे आणि दुसरा खड्डा पावसाचे पाणी जिरण्यासाठी मोकळा सोडून द्यावा यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे यांनी याप्रसंगी दिली.
पुढील तीन महिन्यांमध्ये दापोली तालुक्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार असून, तमाम नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि येणाऱ्या वातावरण बदला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन या निमित्ताने डॉ.प्रशांत परांजपे यांनी केले आहे. हॉर्न बिल पक्षी हा दीर्घकाळ जगणारा आणि मोठ्या प्रजातीचा पक्षी आहे. याच्या संवर्धनार्थ जंगल राखणं आवश्यक आहे कारण हा पक्षी जुन्या पुरातन वृक्षांच्या ढोली मध्ये राहतो. जर ही झाडे विकासाच्या नावाखाली तोडली गेली तर त्या पक्षाचे वास्तव्य अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे.
याकरिताच सर्वांनी नवीन झाडं जगवण्याबरोबरच जुन्या झाडांचे संवर्धन करणे आवश्यक गोष्ट असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे या मोहिमेत ज्या नागरिकांना वृक्ष लागवड करून जलसंवर्धन करायचे असेल त्यांनी संस्थेचे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.