ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार स्टेटस ठेवल्यामुळे संतापलेल्या सरपंचाच्या भावाकडून तरुणाला बेदम मारहाण…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील टोप येथील ग्रामपंचायती मधील साडेअकरा कोटीचा भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप करत संदर्भातील कामाचा स्टेटस व्हाट्सअप वर ठेवल्यानंतर संबंधित तरुणाला सरपंचाच्या भावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. सरपंचाच्या भावाकडून हॉकी स्टिकने मारहाण करत तरुणाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित तरुणाने पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. संबंधित घटना हातकणंगले तालुक्यातील टोप येथे घडलेली आहे. नागेश पिलाजीराव पाटील (वय ३९, रा.कासारवाडी फाटा,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नागेश यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागेश पाटील यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या एका कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो आपल्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवला होता. याच गोष्टीचा गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी नागेश यांच्या राहत्या घरासमोर गाठले.

संशयित आरोपींनी बेकादेशीर जमाव जमवून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी धनाजी बाबुराव पाटील आणि सागर पाटील यांनी हॉकी स्टिकने नागेश यांच्या उजव्या पायावर व हातावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यांच्या तक्रारीवरून धनाजी बाबुराव पाटील, भगवान शंकर भोसले, सुनील बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, विजय आनंदा भोसले, युवराज देसाई व सागर पांडुरंग पाटील सर्व रा.भोसले खडी, ता.हातकणंगले अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.