आंबा घाट उद्यापासून अवजड वाहतुकीसाठी खुला करा अन्यथा अडथळे मोडून वाहने नेऊ

आमदार किरण सामंत यांचा प्रशासनाला सज्जड इशारा

देवरूख (प्रतिनिधी)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आंबा घाटातील अवजड वाहतुकीच्या प्रश्नावर अखेर आमदार किरण सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून उद्यापासून (रविवारी) हा घाट अवजड वाहनांसाठी तातडीने मोकळा करण्याचे थेट आदेश त्यांनी संबंधित प्रशासकीय विभागाला दिले आहेत. मार्ग खुला न केल्यास वाहनधारक सर्व प्रशासकीय अडथळे मोडून वाहने घेऊन जातील, असा थेट व सज्जड इशारा दिल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीसह लगतच्या तीन जिल्ह्यांतील हजारो वाहनचालक, मालक आणि लाकूड व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

साखरपा येथील नानासाहेब शेट्ये सभागृहात आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यातील असंख्य वाहन मालक, चालक तसेच लाकूड व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वाहतूक बंदीमुळे होणाऱ्या कोट्यवधींच्या नुकसानीची आणि रोजगारावर आलेल्या संकटाची कैफियत मांडली. व्यापाऱ्यांची व चालकांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार सामंत यांनी तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून घाट मार्ग अवजड वाहनांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस ओंकार सुर्वे, अंकुश सुर्वे, संतोष चव्हाण, योगेश चव्हाण, रमेश पंदेरे, मंगेश शिंदे, गजानन पवार, राजेंद्र बाबू जाधव, महेश राजवाडे, बंटी पास्टे, सागर बिरवटकटर यांच्यासह जनक जागुष्टे, नंदन डोंगरे, श्यामशेठ मोहिरे आदी प्रमुख वाहनधारक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबा घाटातील वाहतूक सुरळीत होण्याच्या मार्गावर असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गावरील वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे