कोळंब भटवाडी लोकवस्तीत बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण

वन विभागाने तातडीने लक्ष द्यावे : ग्रामस्थांची मागणी….

मालवण | प्रतिनिधी : कोळंब भटवडी लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्या दिसून आल्याने कोळंब पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. कोळंब मार्गावरून प्रवास करताना पर्यटकांच्या गाडी समोर अचानक बिबट्या येऊन थांबल्याने पर्यटक ही घाबरून गेले होते. थेट लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्या दर्शनास आल्याने ग्रामस्थ व पाळीव जनावरे यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाने याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी कोळंब ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मालवण कोळंब भटवडी येथील लोकवस्तीच्या ठिकाणी गुरुवारी रात्रौ 9.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पर्यटकांच्या गाडी समोर अचानक आल्याने पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या बिबट्याला पाहता क्षणी पर्यटकांनी आपली गाडी थांबवून त्या बिबट्याला जाण्यासाठी मार्ग दिला.

पुढे कोळंब हडकर नाक्यावर येऊन स्थानिक ग्रामस्थ आबा भोजने यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना सतर्क केले. भटवाडी येथील आबा साळसकर यांच्या घराजवळ हा बिबट्या दिसून आला. त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या पानंद मधून हा बिबट्या पुढे जंगलमय परिसरात गेला असल्याचे भोजने यांनी सांगितले. रेवंडी परिसरातून कोळंब मुख्य रस्ता पार करून कातवड येथील जंगलमय भागात गेला आहे.

भर लोकवस्ती मध्ये बिबट्या चा मुक्त संचार दिसून आल्याने
ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण आहे.त्याच बरोबर ग्रामस्थांच्या व पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने याबाबत तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कातवड पोलीस पाटील हेमंत परब यांनी वन विभाग अधिकरी यांना या बाबत माहिती दिली असून या भागाची पाहणी वन विभाग अधिकारी करणार आहेत.