गुहागर प्रतिनिधी:
शृंगारतळी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे यांना निवेदन दिले.
शृंगारतळी बाजारपेठ, महामार्गाच्या दुतर्फा तसेच मळण रोड, वेळंब फाटा आणि पालपेणे रोड येथील नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व कचरा साचला आहे. यामुळे पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर यांच्यासह मनसैनिक विवेक जानवलकर, पार्थ पावरी, आणि वेदांत पोमेंडकर उपस्थित होते.













