मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम २० जूनपर्यंत पूर्ण होणार? नितीन गडकरींचे आश्वासन

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधले. महामार्गाचे उर्वरित काम २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक टप्प्यांमध्ये अजूनही काम प्रलंबित असून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार आहे.


हुसेन दलवाई यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम येत्या २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिल्लीतील गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी महामार्गाशी संबंधित विविध समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. त्याची दखल घेत गडकरी यांनी उर्वरित काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

महामार्गावरील वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे दलवाई यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. २०११ पासून सुरू असलेले रुंदीकरणाचे काम गेल्या जवळपास १५ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या कालावधीत अनेक मोठ्या कंत्राटदार कंपन्या बदलण्यात आल्या, मात्र अपेक्षित प्रगती झालेली नाही. सध्याच्या स्थितीनुसार रायगड जिल्ह्यातील १४० किलोमीटरच्या टप्प्यांपैकी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम अद्याप प्रलंबित आहे.