रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
पाली बाजारपेठेतील गॅरेजमध्ये थरार; दोन संशयितांनी केला पाठलाग
दोन दिवसांपूर्वी लांज्यात झालेल्या कोयता हल्ल्याची पार्श्वभूमी
रत्नागिरी (प्रतिनिधी):
लांजा तालुक्यातील वेरळ बौद्धवाडी येथे पूर्व वैमनस्यातून ५९ वर्षीय वृद्धावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेल्या आरोपीचा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली बाजारपेठेत शोध घेऊन, त्याला लोखंडी स्टूल व पान्ह्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रतिहल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव जनार्दन गौतम जाधव (वय ३६, रा. वेरळ बौद्धवाडी, लांजा, सध्या रा. अंधेरी आंबोली) असे असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी रात्री ७.३० वाजता वेरळ एस.टी. स्टॉप येथे जुन्या वादावरून जनार्दन जाधव याने प्रभाकर उर्फ भाई बाबू जाधव (वय ५९) यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते व तो पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता.
हल्ल्यानंतर आरोपी जनार्दन जाधव हा दोन ते तीन दिवस अंजणारी एस.टी. स्टॉपच्या पाठीमागे कुणालाही न दिसता लपून राहिला होता. दोन दिवस काहीही खाल्ले नसल्याने, तो ५ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बस पकडून पाली एस.टी. स्टॉप येथे आला. तेथून पाली बाजारपेठेत काहीतरी खावे आणि त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर व्हावे, असे जनार्दनने ठरवले होते. मात्र, तो पाली बाजारपेठेत आला असता, आधीच्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या उद्देशाने मागावर असलेल्या आरोपींनी त्याला गाठले.
जनार्दन जाधव पाली बाजारपेठेत दिसताच संशयित आरोपी प्रसाद प्रभाकर जाधव आणि अमोल अशोक जाधव (दोन्ही रा. वेरळ बौद्धवाडी, लांजा) यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. जनार्दन जीव वाचवण्यासाठी पळत असताना, आरोपी प्रसाद जाधव याने पाली बाजारपेठेतील एका गॅरेजमधील लोखंडी स्टूल उचलून जनार्दनच्या डोक्याच्या उजव्या बाजूला जोराने मारले. तर दुसरा आरोपी अमोल जाधव याने गॅरेजमधील लोखंडी पान्हा घेऊन त्याच्या उजव्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण मारहाणीत जनार्दन जाधव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खांद्याला मोठा मुका मार लागला आहे.
या घटनेची फिर्याद स्वतः जखमी जनार्दन गौतम जाधव याने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रसाद प्रभाकर जाधव आणि अमोल अशोक जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची नोंद ५ जून रोजी रात्री २१.४१ वाजता करण्यात आली असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













