राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा भजन महोत्सव उत्साहात संपन्न

यानिमित्ताने पार पडला सेवा निवृत्तांचा सन्मान

लांजा (प्रतिनिधी) :राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने आयोजित भजन महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने संघाचे क्रियाशील कार्यकर्ते असलेल्या व शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तांचा सन्मान करण्यात आला.
मागच्या पिढीतील लांजा राजापूर मध्ये डबलबारी भजनाच्या माध्यमातून लोकरंजन करणारे वाटुळ गावचे सुपुत्र शिरी बुवा तथा श्रीधर शंकराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेने वाटूळ येथील स्वामी गगनगिरी महाराज मठामध्ये भजन महोत्सव आयोजित केला होता.
संघाच्या कार्यालयासाठी वाटूळ येथील तिवंदे माळावर मुंबई गोवा महामार्गालगत पाच गुंठे जमीन संतोष श्रीधर चव्हाण यांनी आपले वडील भजन सम्राट श्रीधर बुवा चव्हाण यांचे नावे विनामूल्य दिली. त्या जागेवर संघाकडून भजन सम्राट स्वर्गीय श्रीधर बुवा चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री स्वामी गगनगिरी महाराज मठ येथे आयोजित भजन महोत्सवाचे उद्घाटन रमेश काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सुरेश पेडणेकर संघाध्यक्ष सुभाष लाड, ह.भ. प. बाळकृष्ण चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खामकर, मठाधिपती भिकू मांडवकर, लालू बुवांचे सुपुत्र संगीतकार सुनील बुवा जाधव, संतोष चव्हाण, विश्वास चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या भजन महोत्सवात श्री अदिष्टी देवी प्रासादिक भजन मंडळ वाटूळ गौळवाडी, श्री आसरा देवी भजन मंडळ कुरंग बांधवाडी, श्री मल्लिकार्जुन प्रासादिक भजन मंडळ लिंबूची वाडी, श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ भजन मंडळ रत्नागिरी, विठ्ठलवाडी भजन मंडळ वाटूळ या पाच भजन मंडळांनी सुस्वर भजने सादर केली. तर श्री बुवांची गायकीची परंपरा पुढे चालवणाऱ्या तिन्ही पिढ्यातील गायकांनी एकत्र येऊन काही भजने सादर केले. लालू बुवांचे चिरंजीव सुनील बुवा जाधव यांनी श्रीबुवांच्या आठवणीतील अभंग सादर केले व सुंदर भैरवी सादर करून भजन महोत्सवाची सांगता केली.
याच भजन महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये संघाचे क्रियाशील कार्यकर्ते संदीप जयसिंग हांदे,( ग्रामपंचायत अधिकारी) व रामदास नारायण पांचाळ (प्राथमिक शिक्षक) यांचा सेवापूर्ती निमित्त संघाकडून मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचवेळी संदीप हांदे यांची माहिती असलेल्या कोकण मिडिया विशेषांकाचे प्रकाशन झाले.
भजन महोत्सवाचे प्रमुख म्हणून महेश बामणे तर उपक्रम प्रमुख म्हणून विराज चव्हाण यांनी काम पाहिले. खजिनदार सदानंद खामकर, श्रीमती खामकर, संयोजक गणेश चव्हाण, संघ सरचिटणीस प्रमोद पवार, सदस्य मिलिंद कोटकर. संघाचे स्थानिक प्रमुख कार्यकर्ते महेंद्र साळवी, मंगेश चव्हाण, अजय चव्हाण संतोष भुर्के, प्रसाद चव्हाण या सर्व मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे निवेदन विशाल मोरे यांनी केले.