पावसाळ्यापूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
लांजा – संतोष कोत्रे : राजकीय आणि संबंधित शासकीय विभागाच्या अनास्थेमुळे गवाणे- कोलधे -कोट या कायम रहदारी असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ठीकठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे दुचाकी आणि तीनचाकी सारखी वाहने चालवताना चालकांची तारेवरती कसरत होत आहे. त्यामुळे किमान पावसाळ्यापूर्वी तरी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली आहे.

लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या गवाणे कोलधे कोट हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरून एसटीसह अन्य खाजगी वाहनांची सतत रहदारी असते. सन २००९ मध्ये माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या १३ किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र गेल्या दहा वर्षात या रस्त्याकडे राजकीय नेत्यांबरोबरच बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे रस्त्याची सद्यःस्थितीत अतिशय दूरवस्था झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरण न झाल्याने या १३ किमी रस्त्याची सद्यःस्थितीत अतिशय दूरवस्था झाली आहे. ठीकठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता देखील गायब झाला आहे. काही ठिकाणी रस्त्याखालील खडी देखील वर आली आहे. यामुळे अनेक मोटरसायकलचे अपघात देखील झालेले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे हे वाहनांच्या अपघातात कारणीभूत ठरत आहेत .एकूणच हा रस्ता वाहन चालकांसाठी अतिशय धोकादायक बनला असून तो मृत्यूचा सापळा बनला आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उघडला असून जाडी खडी वर आली आहे. एखादे अवजड वाहन गेल्यास त्याच्या टायर द्वारे खडी उडून एखादा व्यक्ती देखील जखमी होऊ शकतो इतकी गंभीर परिस्थिती आहे.
रस्त्याच्या या गंभीर दुरावस्थेमुळे वाहन चालवताना आणि विशेषतः दुचाकी, रिक्षा यासारख्याचा वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने आपटतात. रस्त्यावरून दुचाकी तीनचाकी वाहन चालवणे अतिशय धोकादायक बनले आहे. तसेच रस्त्याच्या साईट पट्ट्या देखील खराब झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारचा धोका असून कधीही अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे.
रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे













