परुळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची पार्किंग केलेल्या दोन कारला धडक बसून अपघात

डंपर कोसळला माड पोपळी बागायती मध्ये : कार मध्ये कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला

परुळे : प्रतिनिधी
परुळे आदिनारायण मंदिर समोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची पार्किंग केलेल्या दोन कारला धडक बसून अपघात झाला. अपघाता नंतर डंपर माड पोपळी बागायती मध्ये जाऊन कोसळला सुदैवाने कार मध्ये कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दोन्ही कार मधील माणसे अपघातावेळी आदिनारायण मंदिरात दर्शनासाठी गेली होती. आरोसकर, सामंत कुटुंबावर काळ आला होता मात्र सुदैवाने देवदर्शनाला गेल्याने ते सर्वजण बचावले आहेत. कारला डंपर ने टक्कर दिल्यानंतर हॅन्ड ब्रेक करून उभी केलेली कार सुमारे ७० फूट हून अधिक फरफटत रस्त्यावरून गेली कार पूर्णपणे डॅमेज झाली असून डंपर चालक नशा करून डंपर चालवत असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे म्हणणे होते. अपघात होताच घटनास्थळावरून डंपर चालकाने पळ काढत पोलीस स्टेशनचा आसरा घेतला. ही घटना आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
केळूस येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ मंदार आरोसकर व वेंगुर्ले येथील ओंकार सामंत आपल्या कुटुंबासह श्री देव आदिनारायणाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी रस्त्याच्या बाजूला दोन्ही गाड्या पार्क करून ठेवल्या होत्या. कुडाळहून येणारा डंपर आदिनारायण मंदिराच्या उताराला सुसाट वेगाने आल्याने आणि चालक नशेत असल्याने त्याचा डंपर वरील ताबा सुटला आणि थेट पार्क करून ठेवलेल्या दोन्ही कारला ठोकर देऊन येथील जुन्या बस स्टॉप ला जाऊन धडकला आणि बागायती मध्ये कोसळला.
दोन्ही कार चे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. निवती पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व अपघात ग्रस्त कार रस्त्यावर हटवण्याचे ठरविले मात्र त्यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांनी ठोस भूमिका घेत जोवर डंपर चालकाची अल्कोहोल चाचणी होत नाही तोपर्यंत अपघात गस्त वाहने हटवू नये अशी भूमिका घेतली. पोलिसांकडून चालकाच्या अल्कोहोल चाचणीस उशीर होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी पोलिस व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून निघून गेले रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.