मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांचे सुयोग्य नियोजन
13 ते 15 ऑगस्ट कालावधीत फडकणार हर घर तिरंगा
राजापूर | प्रतिनिधी : स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत देशभरात राबविल्या जात असलेल्या माझी माती माझा देश आणि हर घर तिरंगा अभियानाचे राजापूर नगर परिषदेने सुयोग्य असे नियोजन करत या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करताना नागरीकांना आपल्या घरे, दुकाने यावर फडकविण्यासाठी तिरंगा ध्वजही उपलब्ध करून दिले आहेत.
नेहमीच शहरवासीयांसाठी वेगळं काहीतरी करण्याची जिद्द बाळगून काम करणारे तरूण मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी या उपक्रमांतर्गत सुयोग्य असे नियोजन केले आहे. याला शहर वासीयांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून शहरातील व्यापारी संघासह विविध सामाजिक संघटना, राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांनी माझी माती माझा देश आणि हर घर तिरंगा अभियानात सर्व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
आपल्या देशा विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच आपल्या प्राणांची आहुती देणा-या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन, वीरों को वंदन ) हे अभियान संपूर्ण देशात राबविणेत येत आहे. राजापूर नगर परिषदेच्या वतीने देखील माझी माती माझा देश हे अभियान शहरात राबविले जाणार असून या अभियानात शहरातील सर्व नागरीकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राजापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अभियानांतर्गत राजापूर शहरातील राजीव गांधी क्रिडांगण येथे शिलाफलकाची उभारणी करणेत येणार आहे. वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत राजीव गांधी क्रिडांगण येथे ७५ रोपटयांची लागवड करून अमृतवाटीका तयार करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे.देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या अशा संरक्षणदल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य, आजी /माजी सैनिकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे.राजापूर नगरपरिषद क्षेत्रा मधील प्रभागनिहाय एक, दोन मूठ माती घेऊन ती कलशामध्ये संकलित करणेत येऊन मातीचा अमृत कलश राजधानी दिल्ली येथे पाठविणेसाठी तो जिल्हास्तरावर पाठविणेत येणार आहे.
दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जाणार असून या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविणेचा आहे. यासाठी नगर परिषदेकडून अल्प दरात राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करून देण्यात आला असून राष्ट्रीय ध्वज फडकविण्याबाबत असलेल्या संहीतेची प्रतही नागरिकांना दिली जात आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तसेच दुकान यावर योग्य प्रकारे तिरंगा ध्वज फडकवावा, त्याचा सेल्फी घ्यावा व तो नगर परिषदेच्या पोर्टलवर अपलोड करावा असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.मेरी माटी मेरा देश अभियान हे राष्ट्र कर्तव्य असल्याने दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुर विरांना विनम्र अभिवादन शिलाफलक अनावरण व अमृतवाटीका वृक्षारोपण कार्यक्रम केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नगर परिषद सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच शहरातील माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, व त्यांच्या परिवारातील सदस्यपत्रकार, व शहरातील विविध मंडळामधील पदाधिकारी व सर्व नागरीकांनी राजीव गांधी क्रिडांगण येथे या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.
या अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या या सर्व उपक्रमांमध्ये शहरातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मेरी माटी मेरा देश हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्याधिकारी भोसले यांनी केले आहे. या अभियानाच्या यशस्वीततेसाठी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.
मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी मुख्याधिकारी म्हणून काम करताना आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. गतवर्षीही हर घर तिरंगा अभियानांतर्गत त्यांनी शहरात मोठया प्रमाणावर जनजागृती करत ही मोहिम यशस्वी केली होती. तर स्वच्छता अभियानातही ते जातीनिशी लक्ष घालुन काम करत असतात. त्यामुळे शहरवासीयांच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या अभियानातही त्यांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.










