लोटे एमआयडीसीत टँकर चालकांमध्ये हाणामारी; लाकडी दांडक्याने मारहाण, गुन्हा दाखल

खेड | प्रतिनिधी – खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात एका चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप चंद्रभान सिंह (वय ३३, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) हे ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये आपल्या टँकरमध्ये बसले होते. यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही टँकर चालकांनी आपल्या वाहनांना सुरक्षेसाठी लाकडी ठोकळे लावले नसल्याचा व्हिडिओ सिंह यांनी तयार करून ट्रान्सपोर्ट कार्यालयात पाठवला व तक्रार केली, असा संशय इतर चालकांना आला.
या गैरसमजातून आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांनी सिंह यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर संतापाच्या भरात दोघांनी लाकडी दांडक्याने सिंह यांना बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत सिंह यांच्या शरीराला दुखापत झाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर संदीप सिंह यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून ८ जून २०२६ रोजी आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत असून आरोपींच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. लोटे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या या घटनेची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.