आंबोली पर्यटन महोत्सवामुळे आंबोली जगाच्या पर्यटन नकाशावर झळकेल : ना. दीपक केसरकर

आंबोली पर्यटन महोत्सवामुळे आंबोली जगाच्या पर्यटन नकाशावर झळकेल : ना. दीपक केसरकर
आंबोली पर्यटन महोत्सवाचे थाटात उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी : नैसर्गिक वरदान लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे सोन्याची खाण आहे. पूर्वेला उंचच उंच सह्याद्रीचे कडे, या कड्यांवरून दरीत झेपावणारे धबधबे, पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र, गावागावातील अध्यात्म जपणारी मंदिरे यामुळे या जिल्ह्यात पर्यटनासाठी विविधांगी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीच नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून झळकावा म्हणून राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.
आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंबोली वर्षा महोत्सवा ‘चे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पर्यटन महामंडळाचे हनुमंत हेदे, पर्यटन सीईओ संदीप गोसावी, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सिंधुदुर्ग पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, आंबोली माजी सरपंच शशिकांत गावडे, आर्किटेक्चर अमित कामत, उपवनसंरक्षक एस एन रेड्डी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
आंबोली, चौकुळ, गेळे,पारपोली पर्यटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर नेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी एडव्हेंचर स्पोर्टला महत्व देण्यात आले आहे. जंगल सफारी पॅराग्लाइडिंग पेराशूटिंग अशा विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी देशासह विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कावळेसाद पाॅईट साहसी क्रीडा स्पर्धांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आंबोलीसह जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे त्यासाठी आवश्यक असलेला कोट्यावधीचा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ विशेष म्हणजे या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या आणि पर्यटन भरावे यासाठी येथील स्थानिक लोकांना घेऊन हे विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे विशेष करून पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असलेल्या तात्पुरते स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला निधी येथे आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
थंड हवेचे ठिकाण आंबोली हे पर्यटन प्रसिद्ध आहे. तर चेरापुंजीनंतर आंबोली मध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. यावेळी धबधबेही प्रवाहीत होतात. आंबोलीसह सावडाव, नापणे ,मांगेली धबधब्यांवर बारमाही पर्यटन राहावे यासाठी पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, आंबोली परिसरात येणारे पर्यटक किमान तीन ते चार दिवस मुक्काम करतील असे पर्यटन नियोजन केले पाहिजे. धबधब्यापुरते पर्यटन नको तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करून पर्यटन विकास केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी म्हणाल्या, देशात विविध फेस्टिवल होतात तसाच आंबोली वर्षा महोत्सव आहे. जगाच्या नकाशावर आंबोली, सिंधुदुर्ग जिल्हा झळकावा व दरवर्षी महोत्सव व्हावा. आंबोली वर्षा महोत्सव जगप्रसिद्ध होईल.
सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी प्रास्ताविकात स्वागत करून आंबोली वर्षा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे त्याबद्दल धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बादल चौधरी यांनी केले.

पर्यटन विकासामूळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल : राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबायला हवेत. त्यांनी या ठिकाणी पर्यटन करून मुक्काम गोवा येथे केला तर स्थानिकांना मोठा फायदा होणार नाही. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आज सुमारे २० हजार तरुण नोकरीसाठी गोव्यात जातात. त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. ताज हॉटेल बाबत लवकरच निर्णय घेतला पाहिजे. आंबोली मध्ये अनेक पर्यटन पाॅईट आहेत. वन विभागाने थोडी माहिती घेऊन रस्ते, नियम सवलत दिली पाहिजे. तारकर्ली व देवबाग पुरते पर्यटन नको तर जिल्ह्यात बारमाही पर्यटन व्हावे. पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना रोजगार निर्माण होईल, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले.