खोटलेची स्वामी पालखी १२ जूनला अक्कलकोटसाठी प्रस्थान करणार

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पवित्र स्वामी पादुका पालखी १२ जून रोजी पुण्यभूमी अक्कलकोटसाठी प्रस्थान करणार आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून स्वामी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याची माहिती मठाधीपती गणेश घाडीगावकर यानी दिली.

या पालखी सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी होणार आहेत. १३ जून रोजी

अक्कलकोट येथील श्री खंडोबा मंदिर, गुरुमंदिर, वटवृक्ष मंदिर आणि समाधी मंदिर या पवित्र स्थळांच्या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावर स्वामी पादुका पालखीची भव्य प्रदक्षिणा परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १४० हून अधिक स्वामी भक्त अधिकृतपणे सहभागी होणार असून, इतर शहरांतील शेकडो भाविकही या यात्रेत सामील होणार आहेत.

या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देवगड-मुटाट येथील श्री रामेश्वर ढोलपथकाचे पारंपरिक ढोल-नृत्य सादरीकरण हे असणार आहे. टाळ, मृदंग आणि स्वामी नामाच्या अखंड गजराने संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

वटवृक्ष मंदिर आणि समाधीस्थळ येथे श्रद्धास्थानातर्फे विशेष भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ जून रोजी पहाटे समाधी मंदिरात स्वामी पादुकांवर राज पूजा व अभिषेक करण्यात येईल. या पूजेनंतर श्रद्धास्थान उत्सव समितीतर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच दिवशी श्रद्धास्थानाच्या वतीने स्वामी भक्तांसाठी एका विशेष संकल्प घोषणेचेही आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोटमधील वटवृक्ष देवस्थान, खंडोबा मंदिर, गुरुमंदिर आणि समाधी मठ प्रशासनाने या पालखीच्या स्वागतासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे.