‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ निवडणुकीत अ‍ॅड. संग्राम देसाईंचा ऐतिहासिक विजय!

 

कुडाळमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे जंगी सत्कार; वकिलांच्या हितासाठी महत्त्वाचे संकल्प जाहीर

कुडाळ, (प्रतिनिधी) ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ या विधी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी प्रस्थापित व दिग्गज उमेदवारांना तगडी फाईट देत ‘टॉप टेन’मध्ये सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक पसंतीची मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या दैदिप्यमान यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कुडाळ येथील ‘लाईम लाईट’ हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. देसाई यांनी मतदार वकिलांचे आभार मानत आपल्या आगामी कार्याचा ‘अॅक्शन प्लॅन’ जाहीर केला.

१५५ उमेदवारांमध्ये घेतली मोठी झेप

निवडणुकीच्या गणितावर बोलताना अ‍ॅड. संग्राम देसाई म्हणाले की, बार कौन्सिलमध्ये दरवर्षी २५ उमेदवार निवडून येत असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यंदा ३० टक्के महिला आरक्षण ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये ७ महिला रिंगणात होत्या. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २ लाख ४० हजार वकिलांची नोंदणी होती, मात्र कठोर व्हेरिफिकेशननंतर १ लाख ७० हजार वकील मतदानासाठी पात्र ठरले. एकूण १५५ उमेदवार नशीब आजमावत होते. रिंगणात दोन-तीन वेळा निवडून आलेले प्रस्थापित उमेदवार असतानाही, मतदारांनी आपल्याला सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक पसंतीची मते दिली. या यशाबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि मुंबई येथील सर्व वकील बंधू-भगिनींचे जाहीर आभार मानले.

वकिलांच्या कल्याणासाठी आगामी ‘संकल्प’

पत्रकार परिषदेत अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी वकिलांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या:
कोल्हापूर सर्किट बेंच: कोल्हापूर येथील हायकोर्टाचे सर्किट बेंच कायमस्वरूपी (पर्मनंट) करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
बार कौन्सिल इमारत: बार कौन्सिलला मिळालेल्या स्वतःच्या जागेवरील इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणार.
तळोजा ट्रेनिंग सेंटर: देशातील नवनिर्वाचित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स ट्रेनिंग अँड अकॅडमी रिसर्च सेंटर’ (तळोजा) या इमारतीत तरुण वकिलांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार.
शासनाला कायदेशीर मदत: महाराष्ट्र शासनाला कायदे तयार करताना विधीमंडळात लागणारी मदत पुरवण्यासाठी एक मजबूत ‘रिसर्च टीम’ (संशोधन गट) तयार करण्यात आली आहे.
अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट: वकिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट’बाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
मेडिक्लेम व डेथ क्लेम: वकिलांना आरोग्य संरक्षण मिळण्यासाठी मेडिक्लेम आणि दुर्दैवी घटनेत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून ‘डेथ क्लेम’साठी विशेष फंड (निधी) उभारणार.
तरुण वकिलांना स्टायपेंड: नवीन तरुण वकिलांसाठी पहिली ५ वर्षे खूप कठीण आणि संघर्षाची असतात, म्हणूनच त्यांना ‘स्टायपेंड’ (विद्यावेतन) कसा देता येईल, यासाठी एक निश्चित प्रोसेस (प्रक्रिया) तयार करणार.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय पाठबळ

“मी कोणताही राजकीय अजेंडा मनात न ठेवता सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन काम केले आणि मला वकिलांशिवाय समाजाच्या सर्वच स्तरातून मोठी मदत झाली,” असे देसाई यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
तसेच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले. उदय सामंत यांनी आजच्या घडीला कोट्यवधी रुपये किंमत असलेली अडीच एकर जागा ट्रेनिंग सेंटरसाठी नाममात्र रकमेत उपलब्ध करून दिली आहे. विजयाची बातमी मिळताच मुख्यमंत्र्यांनीही फोन करून अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले.

“४०-५० वर्षांत जे झाले नाही, ते ५ वर्षांत करून दाखवले”

सत्कार समारंभात बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक म्हणाले की, “संग्राम देसाई यांची इच्छा नसतानाही आमच्या आग्रहाखातर ते निवडणुकीला उभे राहिले. बार कौन्सिलच्या माध्यमातून गेल्या ४०-५० वर्षांत महाराष्ट्रात जे काम झाले नव्हते, ते देसाई यांनी अवघ्या ५ वर्षांत करून दाखवले आहे. भविष्यात त्यांनी केवळ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलपुरते मर्यादित न राहता ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ (BCI) मध्ये जाऊन देशात नेतृत्व करावे,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार सोहळ्याला आणि पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक, अ‍ॅड. अमोल सामंत, विवेक मांडकूलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष गौरव पडते, अमित हरमळकर, यतिश खानोलकर, राजीव बिले, आनंद गवंडे, अविनाश परब, रुपेश परुळेकर, श्याम सावंत, अ‍ॅड. निंबाळकर, अजित भणगे, रुपेश देसाई, सुहास सावंत यांसह जिल्ह्यातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.