देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेतर्फे आमदार, वनमंत्री, वनविभाग, मानद वन्यजीव रक्षक, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करणार
देवरूख (प्रतिनिधी):
कोकणातील नद्या, ओढे आणि जलस्रोतांमध्ये वाढत असलेल्या पर्यावरणविरोधी प्रकारांबाबत देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली असून या प्रकारांना तात्काळ आळा घालण्यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अलिकडच्या काळात काही भागांमध्ये मोरचुद (कॉपर सल्फेट) व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून मासेमारी करणे, करंटच्या साहाय्याने मासे पकडणे तसेच खेकडे पकडण्यासाठी गावातील जलबंधारे आणि पाणी अडवणाऱ्या संरचना उद्ध्वस्त करण्याच्या घटना समोर येत आहेत. हे प्रकार केवळ बेकायदेशीर नसून संपूर्ण जलपरिसंस्था, जैवविविधता आणि ग्रामीण जलसुरक्षेसाठी अत्यंत घातक असल्याचे क्रांती व्यापारीने म्हटले आहे. मोरचुद आणि इतर रसायनांच्या वापरामुळे मोठे मासे, लहान पिल्ले, अंडी, खेकडे, कोळंबी, बेडूक तसेच इतर अनेक जलचरांचा मृत्यू होतो. यामुळे नदीतील नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होऊन जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. करंटच्या साहाय्याने होणारी मासेमारी देखील तितकीच धोकादायक असून यात सर्व प्रकारचे जलचर बाधित होतात.
याशिवाय काही ठिकाणी खेकडे पकडण्यासाठी जलबंधारे तोडल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. गावांमधील जलबंधारे हे भूजल पातळी टिकवणे, विहिरींना पाणी उपलब्ध करणे, शेतीला आधार देणे आणि उन्हाळ्यात पाण्याचा साठा निर्माण करणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा संरचना उद्ध्वस्त करणे म्हणजे संपूर्ण गावाच्या जलभवितव्याशी खेळ करण्यासारखे असल्याचे मत क्रांती व्यापारीने व्यक्त केले आहे. कारखान्यांनी किंवा बाहेरील घटकांनी नदी प्रदूषित केली तर आपण निषेध करतो; मात्र आपल्या गावातीलच काही व्यक्ती क्षणिक मौजमजेसाठी नदीत रसायने टाकत असतील, करंट वापरत असतील किंवा जलबंधारे तोडत असतील तर हा प्रकार अधिक गंभीर आहे. गावावर प्रेम करायचे की गावाच्या मुळावर घाव घालायचा, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे क्रांती व्यापारीच्या वतीने सांगण्यात आले.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, संवेदनशील भागांमध्ये विशेष गस्त वाढवावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी, यासाठी क्रांती व्यापारीतर्फे लवकरच मा आमदार, वन मंत्री, वन विभाग, मानद वन्यजीव रक्षक, तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे. कोकणातील नद्या, जलचर आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सजग राहून अशा प्रकारांची माहिती संबंधित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन क्रांती व्यापारीने केले आहे. नदी वाचवा..जलचर वाचवा.. जलबंधारे वाचवा.. कोकण वाचवा हा संदेश देत क्रांती व्यापारीने या विषयावर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.












