बुजलेली गटारे आणि धोकादायक साईट पट्ट्यांमुळे अपघात होण्याची शक्यता

लांजा कोर्ले रस्त्यावरील स्थिती, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रमुख राज्य मार्गांपैकी एक असलेल्या लांजा -कोर्ले या रस्त्यालगची गटारे ही पूर्णपणे बुजली असून साईड पट्ट्या देखील धोकादायक झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात अपघाताचा धोका संभवत असून याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख शांताराम गुरव यांनी केली आहे .
याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लांजा यांना सादर करण्यात आले आहे. लांजा कोर्ले रस्ता हा प्रमुख मार्ग राज्य मार्ग असून तो वळणावळणाचा आणि झाडी झुडपातून जाणारा रस्ता आहे. सदर रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे पूर्णपणे बुजलेली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि माती ही रस्त्यावर येत असते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे देखील त्यामुळे कोसळून अपघात होण्याची शक्यता असते. याबरोबरच बरेच ठिकाणी रस्ता अरुंद आहे. तेथे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. वेरवली कोंड येथील घाटी ही पूर्णपणे धोकादायक असून पावसाळ्यात ही घाटी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या या पूर्णपणे मातीच्या असल्यामुळे त्यांचा पावसाळ्यात धोका जास्त असतो. त्यामुळे या साईट पट्ट्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे शांताराम गुरव यांनी नमूद केले आहे.
अशाप्रकारे धोकादायक झालेल्या साईट पट्ट्या, बुजलेली गटारे या दृष्टीने या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी शांताराम गुरव यांनी केली आहे.