प्रेमसंबंधातून पतीची हत्या; ‘कार्यक्रम ओके’ कोडवर्डमुळे उलगडले धक्कादायक रहस्य

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पतीच्या हत्येचा कट पत्नीने प्रियकरासोबत रचल्याचा आरोप पोलिस तपासात समोर आला आहे. पतीला चिकन राईस आणण्यासाठी बाहेर पाठवून त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हत्येनंतर प्रियकराने ‘कार्यक्रम ओके’ असा कोडवर्ड वापरून माहिती दिल्याचेही तपासात समोर आले. या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


हत्येनंतर ‘कार्यक्रम ओके’ कोडवर्डचा वापर

बीड : जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या या घटनेत मृत किरण सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. तपासादरम्यान हत्येनंतर प्रियकराने प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा संदेश दिल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच त्यानंतर दोघांमध्ये अनेक तास सोशल मीडियाद्वारे संवाद झाल्याचेही समोर आले आहे.

पतिला चिकन राईस आणायला पाठवून आखला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश परिसरात रस्त्यालगत किरण सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि संशयाच्या आधारे पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियंका सोनवणे हिने पती किरण यांना चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्याचवेळी तिने ही माहिती प्रियकर दशरथ परदेशी याला दिली. त्यानंतर दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांनी किरण यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला आणि गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार अपघातासारखा भासावा यासाठी घटनास्थळी वेगळा बनाव रचण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

हत्येनंतर दशरथ परदेशी याने प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा कोडवर्ड वापरून माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये इन्स्टाग्राम कॉलद्वारे संवाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात प्रेमसंबंध हे हत्येचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. तसेच मृत किरण सोनवणे हे मद्यपान करून पत्नीला त्रास देत असल्याचा दावाही आरोपींकडून करण्यात आला आहे. या सर्व बाबींची पडताळणी करत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.