पुण्यात गोळीबाराची घटना; सहकारनगर परिसरात तणाव, एक जण जखमी

पुण्यातील सहकारनगर परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सहकारनगरमध्ये गोळीबार; पोलिसांचा तपास सुरू

पुणे : शहरातील सहकारनगर परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे 9.55 ते 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका तरुणाला गोळी लागून तो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी तीन राऊंड फायर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी तरुणाचे नाव योगेश मानेकर असे समोर आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, या गोळीबारामागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपास सुरू आहे. काही प्रत्यक्षदर्शींनुसार, चार जणांनी गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिकानेर चौक परिसरात ही घटना घडली असून दोन राऊंड फायर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना टोळीयुद्धाशी संबंधित आहे का, याबाबतही तपास केला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.