न्हावेली चौकेकरवाडी येथील संरक्षक भिंत तात्काळ बांधा; ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

 

न्हावेली (श्रेयस गावडे):न्हावेली-सावंतवाडी-मळेवाड मार्गावरील न्हावेली चौकेकरवाडी येथे मुख्य रस्त्याची साईडपट्टी कोसळून तब्बल दोन वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. न्हावेली चौकेकरवाडी येथील रस्त्यालगतची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यात यावी आणि रस्त्या शेजारील धोकादायक झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संबंधित ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी कोसळल्यामुळे तिथे मोठा खड्डा तयार झाला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी केवळ पाण्याचे पत्र्याचे बॅरल उभे करण्यात आले आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यास पाणी थेट रस्त्यावरून वाहते, ज्यामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेवर बांधकाम विभागाने फक्त तात्पुरती व्यवस्था न करता कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित या मार्गावरील संरक्षक भिंत बांधून पूर्ण करावी आणि रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांची छाटणी करून द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर सावंतवाडीच्या उप अभियंता सौ. इंगळे यांनी आज संध्याकाळी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ त्यावर योग्य ती उपाययोजना करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सावंतवाडी सरपंच संघटना अध्यक्ष प्रवीण पंडित, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्यासह ओम पारसेकर, अमोल पारसेकर, सौरभ पारसेकर, दीपक पारसेकर, अनिकेत धवण, रोहित निर्गुण आणि आकाश निर्गुण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.