खेर्डीचे सुपुत्र उमेश खताते यांची युवासेना सरचिटणीसपदी नियुक्ती

रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी
चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी येथील सुपुत्र तथा युवा नेते उमेश खताते यांची शिवसेनेच्या युवासेना संघटनेत सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र युवासेना कोअर कमिटी सदस्य व कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास भरत गोगावले यांनी दिले आहे.
नियुक्तीपत्रानुसार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश खताते यांची युवासेना सरचिटणीस (रायगड लोकसभा) म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी आणि युवांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचविण्यासाठी त्यांनी कार्य करावे, अशा अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. उमेश खताते यांनी यापूर्वी युवासेनेत विविध पदांवर काम करत संघटनात्मक बांधणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. युवकांमधील त्यांचा व्यापक संपर्क, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे शिवसेना व महायुतीतील विविध नेत्यांनी स्वागत केले आहे. पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार भैय्याशेठ सावंत, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीमुळे चिपळूण, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार” युवासेना सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करत उमेश खताते यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी आणि रायगड लोकसभा मतदारसंघात संघटना विस्तारासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.