KALYAN : कल्याणमध्ये कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळली; फेकून जाणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

 

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिखली भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने स्थानिक महिलेच्या सतर्कतेमुळे या चिमुकलीचा जीव वाचला असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर या सकाळच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना एका पिशवीत नवजात मुलगी आढळून आली. यावेळी काही भटके कुत्रे त्या बाळाच्या आजूबाजूला फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा लावेकर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बाळाला सुरक्षित स्थळी नेले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नवजात मुलीला उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या नवजात मुलीची प्रकृती स्थिर असून तिला काही काळ वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पूजा लावेकर यांच्या सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.