सावंतवाडी : इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ची इमारत जीर्णावस्थेत असून वर्गखोलीचे छप्पर मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान शाळेच्या वर्गखोलीचे छप्पर धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी संबंधित वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसवू नये, अशा स्पष्ट सूचना देत इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगितले. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
यानंतर इन्सुली येथील अंगणवाडीचीही पाहणी करण्यात आली. अंगणवाडीतील फरशी तुटून उखडल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब निदर्शनास आली. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नवीन फरशी बसविण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून काम पूर्ण करण्याचे आदेश गटविकास अधिकारी (BDO) यांना दिले.
या पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी (BDO), ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्रप्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.













