फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी – प्राचार्य डॉ. विजय जगताप

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन सत्र संपन्न
​

सावंतवाडी । प्रतिनिधी : बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, करिअरच्या संधी आणि प्रवेश प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे विशेष फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र अत्यंत उत्साहात पार पडले असून, यामध्ये विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

​या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. जगताप म्हणाले की, फार्मसी क्षेत्रात सध्या रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असून उच्च शिक्षणासाठीही विपुल वाव आहे. त्यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत फार्मसी क्षेत्राचा उगम, त्याचा आजपर्यंतचा प्रवास, संशोधन, औषध निर्मिती, उत्पादन प्रक्रिया, उपचार पद्धती आणि एकंदरीत आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणारे विविध रोजगाराचे पर्याय आणि करिअरच्या संधींबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गेल्या अकरा वर्षांत या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असल्याची अभिमानास्पद माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली.
​यानंतर महाविद्यालयाचे डॉ. विनोद मुळे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे, लागणारी आवश्यक कागदपत्रे, सीईटी सेल (CET Cell) मार्फत राबवली जाणारी प्रवेश प्रक्रिया आणि फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती दिली.
​या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके निवेदन सहाय्यक प्राध्यापिका गौरी भिवशेट यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. तुषार रुकारी यांनी मानले. आपल्या पाल्याच्या भविष्यातील करिअरच्या दृष्टीने हे सत्र अत्यंत मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.