भाजप युवा नेते विक्रांत सावंत यांची ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ सदस्यपदी नियुक्ती

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून शुभेच्छा आणि सहभागाचे पत्र

सावंतवाडी :भाजपचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून त्यांना विशेष शुभेच्छा पत्र प्राप्त झाले आहे.

लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रक्रियेत आता लोकप्रतिनिधी म्हणून विक्रांत सावंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील “जन आरोग्य समिती” आणि रुग्णालयातील “रुग्ण कल्याण समिती” यांच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाण्याची गुणवत्ता तसेच विविध रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. शासनाच्या या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये विक्रांत सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन तळागाळातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या पत्राद्वारे केले आहे.

विक्रांत सावंत यांच्या या नियुक्तीमुळे सावंतवाडी मतदारसंघ आणि परिसरातील आरोग्य विषयक समस्या सोडवण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून, राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.