कणकवली : तरंदळे-खोतवाडी येथील रहिवासी तथा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदीप श्रीधर सावंत (वय ७२) यांचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पशुसंवर्धन क्षेत्रासह सामाजिक व शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रदीप सावंत यांनी आपल्या सेवाकाळात आरवली, अचिर्णे, वैभववाडी, मसुरे, ओरोस आणि दोडामार्ग आदी ठिकाणी कार्यरत राहून उल्लेखनीय सेवा बजावली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याने ते शेतकरी वर्गात विशेष लोकप्रिय होते. मनमिळाऊ स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि जनसंपर्क यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
तरंदळे गावाच्या विकासासाठीही त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यात पशुधन वाढीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सन २००३ मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा विशेष गौरव केला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. इंडियन आर्मीमधील मेजर आशिष सावंत यांचे ते वडील होत.












