कणकवली : बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ मुंबई, हरित मुंबई’ जागतिक गणेश मूर्तिकला स्पर्धा – २०२६ या प्रतिष्ठित स्पर्धेचा अंतिम सोहळा घाटकोपर, मुंबई येथे संपन्न झाला. या स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सुपुत्र प्रशांत जयराम मेस्त्री यांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून आंब्रडसह संपूर्ण कुडाळ तालुक्याचा गौरव वाढविला आहे.
प्रशांत मेस्त्री हे गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात राहून शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची कला जोपासत आहेत. त्यांच्या कलाकृतींमध्ये पारंपरिकता, नावीन्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम दिसून येतो. याच वैशिष्ट्यांच्या बळावर त्यांनी या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सर्वोच्च मान पटकावला. या यशामुळे आंब्रड गावासह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून प्रशांत मेस्त्री यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ग्रामीण भागातील कलाकारांनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रशांत मेस्त्री यांच्या या यशाबद्दल आंब्रड ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच कुडाळ तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.












