आंबा घाट लूटमार प्रकरणातील आठ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले; सत्र न्यायालयाचा मोठा दणका

देवरूख (प्रतिनिधी)

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आठ आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने गंभीर दखल घेत या सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती पाहता आरोपींची सुटका करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

८ एप्रिल २०२६ रोजी आंबा घाट मार्गावर जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडवून चालकाला मारहाण करण्यात आली होती.यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची मागणी केली आणि चालकाच्या खिशातील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. इतकेच नव्हे,तर चालकाला धमकावत काही अंतरापर्यंत सोबत नेल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,विविध गंभीर कलमांखाली कारवाई सुरू आहे. जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने उपलब्ध तपास कागदपत्रांचा आढावा घेतला. गुन्ह्यात शस्त्राचा वापर, वाहनचालकाचे अपहरण व लूटमार यांसारख्या गंभीर बाबी प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

तसेच या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून तपास सुरू असल्याने, या टप्प्यावर आरोपींना जामीन देणे न्याय्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आठही जणांचे जामीन अर्ज फेटाळले. या प्रकरणात फरहान रशीद मुल्ला, प्रथमेश सचिन भाटकर, सर्वेश सुभाष कीर, शार्दुल सुनील कीर, संतोष बाळू गोसावी, शादाब गणी बलबले (मुख्य सूत्रधार),भूषण बिपिंद्र सावंत आणि धर्मलिंगम विजयकुमार नाडर या आठ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणातील अरबाज मजीद बांगी हा आरोपी गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला असून, त्याबाबतची अधिकृत स्थिती पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास करत आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.