१७ महिलांची सुटका, सहा आरोपी अटकेत
डिकॉय ऑपरेशननंतर पहाटे छापा; मालकाचा शोध सुरू
पुणे शहरात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर सेक्स रॅकेटचा दिघी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आळंदी–चऱ्होली रोडवरील हॉटेलमधून १७ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. डिकॉय पाठवून माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पहाटे छापा टाकला. या प्रकरणात हॉटेलमधील व्यवस्थापक व कामगारांना अटक करण्यात आली आहे. महिलांना सुरक्षिततेसाठी रेस्क्यू होममध्ये हलवण्यात आले आहे.
पुणे : दिघी पोलिसांनी मंगळवारी आळंदी–चऱ्होली रोडवरील एका हॉटेलमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत १७ महिलांची सुटका केली. दिघी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक पाटील यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी डिकॉय ग्राहक पाठवण्यात आला.
माहितीची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये १७ महिला आढळून आल्या. तपासात समोर आले की, यातील बहुतांश महिला इतर राज्यांतील असून आरोपींकडून त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात होते. या कारवाईत हॉटेलमधील दोन व्यवस्थापक आणि चार कामगारांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सर्व महिलांना रेस्क्यू होममध्ये सुरक्षित ठेवले आहे. तसेच हॉटेलचा मालक आणि रॅकेट चालवणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143 (मानव तस्करी) तसेच अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.











