सह्याद्रीच्या घनदाट जंगलात १५ जून रोजी ‘काजवे पर्यटन’ मोहिमेचे आयोजन

देवरूख (प्रतिनिधी)

सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार अनुभवण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी देवरूख जवळील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात विशेष ‘काजवे पर्यटन’ आणि सोबतीला ‘रातकिड्यांचे संगीत’ अनुभवण्याच्या एका अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पर्यटनासाठी इच्छुकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, हे पूर्णपणे मोफत आहे.

​शिवछत्रपतींनी आपल्या अनेक यशस्वी मोहिमा जशा अमावस्येच्या रात्री पार पाडल्या, त्याच प्रेरणेतून अमावस्येच्या गडद काळोखात लाखो काजव्यांच्या प्रकाशाची मनमोहक उघडझाप प्रत्यक्ष ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी या मोहिमेचे आयोजन कोकणात करण्यात आले आहे. सोमवार, १५ जून २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता सावरकर चौक, देवरुख येथून सर्व पर्यटकांना स्वतःच्या गाड्या घेऊन निघायचे आहे. देवरुखपासून सुमारे ५० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या घनदाट जंगलात हे पर्यटन होणार आहे. सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत काजवे पर्यटनाचा मुख्य कालावधी असेल. त्यानंतर रात्री १०.०० वाजता तिथून निघून ११.०० वाजेपर्यंत परत देवरुखला पोहोचायचे आहे.
​
​या पर्यटनादरम्यान निसर्गप्रेमींना जंगलातील चमचमणारे काजवे आणि रातकिड्यांचे संगीत तर अनुभवता येईलच, शिवाय सह्याद्रीतील सर्वात मोठे ४० फूट घेराचे आणि १२५ फूट उंचीचे भव्य झाड देखील जवळून पाहता येणार आहे. हे पर्यटन पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर करायचे आहे. रात्रीच्या वेळी जंगलात गवे रेडे, वाघ यांसारखे जंगली जनावरे दिसण्याची शक्यता असल्याने सुरक्षेसाठी प्रत्येकाने सोबत किमान एक काठी बाळगणे आवश्यक आहे. जंगलात पायी फिरण्यासाठी पायात बूट असणे आणि प्रकाशासाठी बॅटरी (टॉर्च) आणणे सक्तीचे आहे. तसेच स्वतःसाठी पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत घेऊन यावे. जर त्या दिवशी पाऊस पडला, तर काजवे पर्यटनाऐवजी पर्यटकांना ‘जंगल सफारी’ व ‘रान न्याहारीचा’ आस्वाद घेता येईल. या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी युयुत्सु आर्ते यांच्याशी ९४२२३५१९२६ / ७७९८७४५४९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.