कुळे दूधसागर नदीपात्रात चार विद्यार्थी बुडाले 

एकाला वाचविण्यात यश 

वास्को : प्रतिनिधी

कुळे – मेटवाडा पूलानजीक दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील चार तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली-मुरगाव येथील तीन सख्ख्या भावांचा समावेश असून हे सर्व युवक १९ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्को आणि चिखली भागातील काही तरुण मित्रांसोबत कुळे येथील नदीवर पर्यटनासाठी आले होते. नदीपात्रात पोहण्याचा आनंद घेत असताना, पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण नदीत बुडू लागले. तरुणांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने धाव घेत एका तरुणाला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. मात्र अन्य चौघांना वाचवण्यात यश आले नाही.

रामन पारसू मदेर (वय १९), लक्ष्मण पारसू मदेर (वय १९), हिरण्णा पारसू मदेर (सर्व रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव), विजय साजिली (रा. न्यू वाडा, गणेश मंदिराजवळ, वास्को – वसंत जोशी कॉलेज, झुआरी नगरचा विद्यार्थी) अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. कुळे पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.