रत्नागिरी:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन आणि वारसा जतनासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. हे किल्ले आपली सांस्कृतिक अस्मिता आणि ऐतिहासिक गौरवाचे जिवंत स्मारक आहेत. या अमूल्य वास्तूंचे जतन व्हावे, ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि किल्ल्यांचा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना या आठवड्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक गड-किल्ले आणि त्यांच्या आसपासच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींवर भर दिला जाईल:
कचरा व प्लास्टिक मुक्ती: किल्ल्यांच्या परिसरात पर्यटकांकडून किंवा अन्य कारणांमुळे जमा झालेला प्लास्टिक कचरा आणि इतर प्रदूषणकारी वस्तूंचे संपूर्ण निर्मूलन केले जाईल.
पर्यावरण संवर्धन: स्वच्छतेसोबतच किल्ल्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
रत्नागिरी पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ एका स्वच्छता मोहिमेपुरता मर्यादित नाही. यामागे एक मोठा सामाजिक संदेश दडला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील नागरिकांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे, पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आणि भावी पिढ्यांसाठी हे गड-किल्ले सुरक्षित व जतन करून ठेवणे हा पोलिसांचा मुख्य प्रयत्न आहे.













