गरज पडल्यास एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करणार : पालकमंत्री उदय सामंत

पाऊस लांबल्याने रत्नागिरीत पाणी संकट

रत्नागिरी | प्रतिनिधी : यंदा पावसाने ओढ दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा केवळ १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, गरज भासल्यास नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरवर्षीच्या तुलनेत १५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ दीड टक्का पाऊस झाला असून, प्रशासनाने आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पाऊस लांबल्याचा मोठा फटका शेतीला बसला असून पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या हलक्या सरींनंतर घाईने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या आणि वेधशाळेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देऊनच पुढील पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. दरम्यान, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचे बियाणे मोफत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा आढावा घेताना सामंत म्हणाले की, यंदा रत्नागिरी-कोल्हापूर या नव्याने झालेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्याची भीती आहे. त्यामुळे या मार्गावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती काळात नागरिकांच्या सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात २१ निवारा केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यासाठी २६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि स्मार्ट सिटीच्या कामांचाही आढावा घेण्यात आला असून रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकीय विषयांवर भाष्य करताना पालकमंत्र्यांनी महायुतीमधील एकजुटीवर भर दिला. रत्नागिरी शहरात काम करताना सर्वांना सोबत घेऊन सांघिकपणे काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. विधान परिषदेच्या १७ जागांपैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ११ जागांवरही महायुतीच विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युबीटीच्या कोणत्याही खासदाराची स्वतंत्र भेट घेतली नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी भेटीच्या अफवा फेटाळून लावल्या. निमंत्रण पत्रिकेत नाव डावलले जात असेल तर त्याबाबत योग्य ठिकाणी दाद मागू, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना, स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.