प्रशासक सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश
आंबोली:
आंबोली परिसरातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, आंबोली गाव हद्दीतील धोकादायक वृक्ष छाटणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि वन विभाग यांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून ही झाडे छाटण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे ग्रामस्थांमधून आणि पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत असून, सर्व स्तरातून या तातडीच्या पावलाचे स्वागत केले जात आहे.
मात्र, गाव हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील झाडे छाटली असली, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर अजूनही अनेक धोकादायक झाडे उभी आहेत. ही झाडेही तात्काळ छाटण्यात यावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच आंबोली घाट परिसरात अजूनही बरीचशी धोकादायक झाडे शिल्लक असून, तिथेही वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने संयुक्त कार्यवाही करून छाटणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, निसर्गरम्य आणि तितक्याच आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या आंबोली घाटात अद्यापही अपघाताचे मोठे सावट कायम आहे. आंबोली घाटात ‘श्री देव पूर्वीचा वस’ मंदिराच्या पुढील बाजूस एक मोठा दगड अत्यंत धोकादायक आणि कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. या गंभीर बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, घाटातील अनेक संरक्षक कठडे सध्या तुटलेल्या अवस्थेत असून यामुळे एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास थेट दरीत कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे कठडे देखील तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे बनले आहे.
लवकरच आंबोली परिसरात मान्सून पर्यटन सुरू होणार असून, पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्या साम्राज्य असते. अशा वातावरणात रस्ते निसरडे होऊन समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे उर्वरित सर्व धोके मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी दूर करावेत, अशी तीव्र मागणी आंबोली परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.









